नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नेहमी काम सांगतो तसेच कुठल्याही कारणातून भांडतो या रागातून संतप्त पुतण्याने आपल्या काकावर चाकू हल्ला केल्याची घटना हिरावाडी येथे घडली. या घटनेत ५० वर्षीय काका जखमी झाला असून पोलीसांनी पुतण्यास तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दिलीप ससाणे (२५ रा.खंडेराव मंदिराजवळ जोशीवाडा हिरावाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पुतण्याचे नाव आहे. याबाबत संजय प्रभाकर ससाणे (५० रा.सदर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार ससाणे यांचा संशयित भावाचा मुलगा असून रविवारी (दि.१८) रात्री त्यास लाईट बिल भरणा केले का? अशी विचारणा केल्याने ही घटना घडली.
संशयिताने विज बिल भरले नसल्याचे सांगितल्याने काकाने त्यास जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या पुतण्याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. तू मला कायम कशाचे तरी कारण काढून भांडण करत असतो आज तुझा गेमच करतो असे म्हणत संशयिताने शिवीगाळ करीत हातातील चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत पोटावर वार करण्यात आल्याने काका जखमी झाला असून पोलीसांनी तात्काळ पुतण्यास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.