नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सासरच्या जाचास कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुगंधा पवार, हरि काळू देवरे, रत्ना हरी देवरे (रा.सातपूर) संध्या मनोहर मांडवळे व मोना गणेश जेऊघाले (रा.दोघी पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. याबाबत प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पवार कुटुंबिय बाहेरगावी असतांना संशयित सून सुगंधा, तिचे आई वडिल बहिण व बहिणीची पुणेस्थीत मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार (४५ रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला.
या त्रासास वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.