टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार
नाशिक – आर्थिक देवाण घेवाणीतून बेदम मारहाण करीत एकावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नानावलीत घडली आहे. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोफिक, हामजा, नऱ्या आणि अक्षय नाईकवाडे अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी नवाज शहाबुद्दीन शेख (१९ रा.गैबान शहा दर्गा मागे,खडकाळी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. नवाज शेख रविवारी (दि.२४) रात्री नानावली येथील दर्गा मागील तबेला भागात गेला असता ही घटना घडली.
तबेल्या जवळ संशयित टोळक्याने त्यास गाठले. यावेळी संशयितांनी शिवीगाळ करीत पैसे देवाण घेवाणीच्या कारणातून वाद घातला. तसेच संतप्त टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त अक्षय या संशयिताने लाकडी दांडक्याने तर तोफिक याने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत शेख याच्या हातावर आणि पाठीवर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.
मुंबईच्या युवकाला उड्डाणपुलावर बेदम मारहाण
नाशिक – मुंबईच्या एका युवकाला द्वारका जवळ उड्डाणपुलावर बेदम मारहाण करण्यात आली आहे. या युवकाला बेशुद्धावस्थेत टाकून चौघे जण फरार झाले आहेत. हा युवक रात्रभर उड्डाणपुलावर बेशुद्धावस्थेतच पडून होता. आता त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अभिनेष जगन्नाथ गुप्ता (वय ३५, रा. संयोग चाळ, आयआयटी मार्केट, महात्मा ज्योतिबा फुलेनगर, भांडूप, मुंबई) हा युवक मुंबईला जाण्यासाठी द्वारका चौकात उभा होता. त्यावेळी तिथे एक रिक्षा आली. त्यात चालकसह चार जण बसलेले होते. ‘आम्ही तुला पुढे सोडतो. तेथून तुला मुंबईला जाण्यासाठी गाडी मिळेल.’, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर गुप्ता हा रिक्षात बसला. रिक्षा उड्डाणपुलावर आणल्यानंतर या चौघांनी रिक्षा थांबवून गुप्ताला बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. काही कळायच्या आतच हे घडत असल्याने गुप्ता घाबरला. गुप्ताकडील ४ हजार रुपये रोख व नवीन मोबाईल बॉक्स हिसकावून घेतला. तसेच बेदम मारहाण झाल्याने गुप्ता बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला तेथेच टाकून चौघांनी पळ काढला. सकाळी मुंबई पोलिसांना ही बाब समजली. त्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक गेगजे तपास करत आहेत.