नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महात्मानगर भागात त्रिकुटाने चाकू हल्ला करीत दोन लाखाची रोकड असलेली बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघा मित्रांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने भामट्यांनी धुम ठोकली असून यावेळी झालेल्या झटापटीत बांधकाम व्यावसायीकासह अन्य एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१८) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास महात्मानगर येथील पाण्याची टाकी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दीपक रामू खताळे (रा.वेळूंजे ता. त्र्यंबकेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. खताळे बांधकाम ठेकेदार असून त्यांचे शहरात नियमीत येणे जाणे असते. शनिवारी रात्री व्यावसायीक मित्र शारीक शेख यांच्या महात्मानगर येथील कार्यालयात जात असतांना हा लुटमारीचा प्रयत्न झाला. खताळे यांच्यासह शारिक शेख व जयेश वाघ हे तिघे मित्र पाण्याची टाकी भागातील कार्यालयात चारचाकीतून गेले असता कारमधून उतरत असतांना दबा धरून बसलेल्या त्रिकुटाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी एका मित्राच्या हातातील रोकड असलेली बॅग भामट्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला मात्र तिघा मित्रांनी प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केल्याने लुटारूनी धुम ठोकली.
तिघा मित्रांचा प्रतिकार करून संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र लुटारूंनी दोघांवर चाकू हल्ला करीत धुम ठोकली. या घटनेत एकाच्या हातावर तर दुस-याच्या कानाजवळ चाकूने वार करण्यात आल्याने दोघे जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत गंगापूर पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे लुटारूंचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहे.