नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरावर सोलर पॅनल बसविण्याचे आश्वासन देत भामट्याने एकास ५० हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्ष उलटूनही संशयिताने सोलर पॅनल अथवा पैसे परत न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय रोहिदास पगार (रा.वक्रतुंड अपा.श्री गुरूजी हॉस्पिटलमागे आंदवली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गोपाळ पंडीत सावकार (रा.ओम अपा.कर्ननगर पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सावकार यांची सन.२०२३ मध्ये दिंडोरीनाका येथील राजाराम भडांगे यांच्या केळीचा गाडा परिसरात संशयिताशी भेट झाली होती. यावेळी त्याने घरावर स्वस्तात सोल पॅनल बसवून देण्याचे आश्वासन दिल्याने ही फसवणुक झाली.
४ मार्च रोजी पॅनल बसविण्याबाबत बोलणी होवून दर ठरविण्यात आला होता. त्यानुसार संशयितास दहा हजार रूपयांचे टोकन देण्यात आले होते. त्यानंतर ४० हजाराचा धनादेश दिला असता संशयिताने तो वटवून घेतला मात्र काम केले नाही. दीड वर्ष पाठपुरावा करूनही संशयिताने पॅनल बसविले नाही तसेच पैसेही परत न केल्याने सावकार यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.