नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –बहुचर्चित मॅफेड्रॉन या अमली पदार्थाची शहरात राजरोसपणे विक्री सुरूच असल्याचे पोलीस कारवाईतून समोर आले आहे. बजरंगवाडी भागात एक २० वर्षीय हॅण्डलर पोलीसांच्या हाती लागला असून त्याच्या ताब्यातून १९ ग्रॅम वजनाचे व सुमारे ९५ हजार रूपये किमतीचा एमडी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
राहूल अशोक ब्राम्हणे (रा.बारा खोल्या महादेव मंदिराजवळ,बजरंगवाडी) असे अटक करण्यात आलेल्या एमडी विक्रेत्याचे नाव आहे. इस्कॉन मंदिराकडे जाणा-या मार्गावर एक तरूण एमडी या अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१६) धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. नासर्डी नदीच्या बाजूने जाणा-या मार्गावरील वटाणेवाडी भागातील एका चिंचेच्या झाडाखाली सदर तरूण संशयास्पद आढळून आल्याने पोलीसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मॅफेड्रोनने भरलेली प्लॅस्टीक पाऊच आढळून आले.
या कारवाईत एमडीसह त्याच्या ताब्यातील दोन मोबाईल असा सुमारे एक लाख ५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पथकाचे हवालदार संजय ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नागरे करीत आहेत.