नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मदतीचा बहाणा करीत भामट्याने एटीएम कार्डची आदलाबदल करीत वृध्दाचे ६६ हजार रूपये लांबविले. ही घटना गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल भागात घडली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत देवराम खताळे (६८ रा.पेठरोड गंगापूरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खताळे गेल्या शनिवारी (दि.१०) पैसे काढण्यासाठी गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल भागात गेले होते. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये ही घटना घडली. पैसे काढत असतांना पाठीमागे उभ्या असलेल्या भामट्यांने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत केली. यावेळी भामट्याने खताळे यांच्या हातातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम कार्डची हातचलाखीने आदलाबदल करून ही फसवणुक केली.
खताळे घरी पोहचले असता त्यांच्या मोबाईलवर पुन्हा पैसे काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाल्याने ही घटना उघडकीस आली. भामट्याने लांबविलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून परस्पर अन्य बुथमधून बँक खात्यातील ६६ हजाराच्या रकमेवर डल्ला मारला. बँक चौकशीनंतर खताळे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.