नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. आताही नाशिकरोडच्या उपनगर भागात एका चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. उपनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात एका १० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला आहे. ही बालिका तिच्या वडिलांसोबत रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर वडिलांनी तिला घराजवळ सोडले. आणि घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने तिचे वडिल घरी परतले. पण त्यांना त्यांची कन्या घरात आढळून आली नाही. त्यांनी तातडीने शोध मोहिम सुरू केली. घराच्या शेजारी राहणारे व स्थानिक यांच्या मदतीने त्यांनी शोध घेतला. अखेर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास श्वानपथकाच्या माध्यमातून बालिकेचा शोध सुरू केला. त्यानंतर परिसरातील एका उद्यानामध्ये ही बालिका आढळून आली. एका अज्ञात व्यक्तीने बालिकेला तिथे सोडल्याचे सांगितले जात आहे. तर, बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांनी जोरदार शोधमोहिम राबविली. त्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.