नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडको भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून वेगवेगळया भागातील दोन घरे चोरट्यांनी फोडले. या घरफोडयामध्ये सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्याचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्रिमुर्तीचौक भागात राहणा-या अंजली अशोक हिरे (रा.दयालजी संकुल,सायखेडकर हॉस्पिटल मागे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हिरे कुटुंबिय दि. ८ ते १४ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली ४ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९० हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटना पवननगर भागात घडली. निलेश सखाराम माळी (रा.लोकमान्यनगर,पवननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माळी कुटुंबिय दि. ११ ते १४ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून कपाटातील ३१ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत पोलीस दप्तरी घरफोडीच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार महाजन व बनतोडे करीत आहेत.