नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालकास सहा लाखाला गंडा घालणा-या नोकाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. रक्कम परत करण्याची ग्वाही देऊन परतफेड न केल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. ललीत मोहन सचदेव (रा.आडकेनगर,देवळाली कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी जयकिशन गेलाराम आहूजा (रा.आनंदरोड दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. आहूजा यांचे नाशिकरोड येथील बादशाह हॉटेल समोर स्टाईल स्टुडिओ नावाचे दुकान आहे. या दुकानात संशयित २०१४ पासून व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. विश्वासू असल्याने संपूर्ण कारभार त्याच्यावर सोपविण्यात आला होता. दुकानमालक आहूजा यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले असता ही घटना घडली.
मालक दुकानात नसल्याची संधी साधत संशयिताने परस्पर मालविक्री केली. त्यातील सुमारे ६ लाख ५४ हजार २१७ रूपयांचा अपहार केला. ही बाब सप्टेबर २०२० मध्ये अहूजा यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जाब विचारला असता संशयिताने नोकरी सोडली. यावेळी रक्कम परत करण्याची ग्वाही देण्यात आल्याने आहूजा यांनी दुर्लक्ष केले मात्र अनेक वर्ष उलटूनही संशयिताने पैशांची परतफेड न केल्याने त्यांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे अहूजा यांनी न्यायालयात धाव घेतली असता हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.