नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीत घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली फिर्याद अनिरूध्द अविनाश कनोरे (रा.कार्तिकेनगर,आयटीआय लिंकरोड) यांनी दिली आहे. कनोरे कुटुंबिय ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता चोरटयांनी त्यांचे बंद घर फोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख २० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
दुसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीतील कामगार नगर भागात घडली. कुमार मंगलम सिन्हा (रा.जय त्रिलोक हौ.सोसा.गुलमोहर कॉलनी, कामगारनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सिन्हा कुटुंबिय गुरूवारी (दि.६) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी लॉक तोडून टीव्ही युनिटच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले सुमारे १५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे टॉप्स चोरून नेले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.