नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गेल्या वर्षी २०२४-२५ च्या हंगामात नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाला मिळालेल्या निर्विवाद विजयामुळे व नाशिक मधील क्रीडा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खुश झालेल्या महाराष्ट्र संघाने यावर्षी नाशिक येथे दोन सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच व नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयचे २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीचा एक व रणजी ट्रॉफीचे दोन अतिशय महत्वाचे सामने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयोजित करण्याची संधी दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची या नव्याने सुरू होत असलेल्या २०२५-२६ हंगामात पुढील तिन महत्वाच्या सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी ए तर्फे तसे सर्व संबंधित राज्य संघटनांना कळविण्यात आले आहे. तिन्ही सामने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होतील.
हे तिन चार दिवसीय सामने म्हणजे :
१ – २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफी साठी १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय सामना
२ – रणजी ट्रॉफी करता महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान होणारा चार दिवसीय सामना व
३- रणजी ट्रॉफी करता महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा ८ ते ११ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान होणारा चार दिवसीय सामना.