नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – २०२२-२३ हे ५० वे – सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने या हंगामात जिल्हा क्रिकेट संघटना विविध नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. त्यात सध्याच्या सायबर , इंटरनेट व डिजिटल युगाला साजेशे असे अजून एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात येत आहे. ते म्हणजे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट – live – प्रसारण करण्याचे निश्चित झाले आहे. स्पोर्टवोट, मुंबई नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे प्रसारण करेल आणि एन.डी.सी.ए अंतर्गत सर्व खेळाडूंची प्रोफाइलिंग करणार आहे .
मुंबईतील स्पोर्ट्स-टेक कंपनी स्पोर्टवोट ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी हात मिळवत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन.डी.सी.ए – चे अधिकृत डिजिटल सहयोगी म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. स्पोर्टवोट यापूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, रायगड कबड्डी असोसिएशन, ठाणे कबड्डी असोसिएशन आणि पुणे स्पोर्ट्स झोनल कमिटी यासारख्या प्रमुख क्रीडा संघटनांसोबत डिजिटल सहयोगी म्हणून कार्यरत आहेत. स्पोर्टवोट हे टेक स्टार्ट-अप आपल्या क्लाउड-स्टुडिओ आणि अँप द्वारे स्थानीय स्तरावर डिजिटायझेशन आणि कार्यप्रदर्शन विश्लेषणाची सवय विकसित करत आहे आणि भारतीय क्रीडा समुदायात एक प्रकारची क्रांती आणत भारतीय क्रीडा विश्वातील एक आघाडीचा ब्रँड बनत आहेत. या प्लॅटफॉर्मवर विविध देशांतर्गत स्पर्धांमधील प्रमुख क्रिकेट पटू झळकले आहेत आणि आता स्पोर्टवोट ते भारतातील नवनवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये आपला पाया विस्तारत आहे.
याविषयी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही आमचे डिजिटल सहयोगी म्हणून स्पोर्टवोटची निवड केल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे . काळाच्या ओघात या खेळाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. खेळाच्या उच्च स्तरावर होणारे बदल व त्यामुळे स्पर्धेत होणारे बदल लक्षात घेता , आम्हाला असे वाटते की स्थानीय स्तरावर देखील तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची वेळ आली आहे, जिथे पहिल्यांदा खेळाडुच्या प्रतिभेच्या खुणा दिसतात. स्पोर्टवोटसोबत आम्ही नाशिकमधील क्रिकेट प्रतिभा केवळ जगासमोर आणण्याचा विचार करत नाही आहोत, तर खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी आणि प्रशिक्षकांना प्रतिभा ओळखण्यासाठी अधिक चांगल्या मार्गांनी मदत करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा बेत आहे”
स्पोर्टवोटने अनेक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. याबद्दल बोलताना, स्पोर्टवोट च्या सह-संस्थापक, सुश्री. शुभांगी गुप्ता यांनी पुढील मत व्यक्त केले, “आम्हाला एन.डी.सी.ए सोबत त्यांचा डिजिटल सहयोगी म्हणून जोडलं गेल्याचा खूप आनंद होत आहे. स्पोर्टवोट मध्ये आम्ही नेहमीच स्थानीय क्रीडा समुदायाला सक्षम बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने काही आशादायक क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना फक्त एक व्यासपीठ हवे आहे जे त्यांना त्यांची प्रतिभा वाढवण्यास मदत करू शकेल, जे त्यांना व्यावसायिक स्तरावर त्यांचा मार्ग मोकळा करण्यास मदत करू शकेल. जे प्रत्येक खेळाडूच्या खेळाचा, त्याच्या रेकॉर्डस्चा मागोवा ठेवते आणि प्रत्येक डेटा मेंटेन करते. एन.डी.सी.ए सह स्पोर्टवोट ची नाशिकमधील २००० + उदयोन्मुख क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची योजना आहे. मला खात्री आहे की हेच सर्व खेळाडू आमच्या ह्या गटबंधनाचे सर्वात मोठे लाभार्थी ठरतील.” तरी नाशिक क्रिकेट बद्दलच्या प्रत्येक माहितीसाठी स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik Cricket Matches Live Telecast