नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणे ने पुदुचेरी येथे आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकी ने सामना गाजवला. आज दुसर्या सामन्यात केरळ विरुद्ध माया ने चार षटकात केवळ १२ धावा देत ४ बळी घेतले. यात १२ निर्धाव चेडुंचा समावेश होता.
सर्वाधिक ३० धावा करणार्या केरळची कर्णधार एस सजनाला त्रिफळाचीत करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला . या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळ ला ९० धावात रोखले . शिवाय ५ बाद ६५ या स्थितित , सातव्या क्रमांकावर फलंदाजी ला येऊन नाबाद ५ धावा करताना महाराष्ट्राला १८ व्या षटकात, दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणे ने मोलाचा हातभार लावला.
याआधी पहिल्या सामन्यात देखील काल आंध्र विरुद्ध अतिशय प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते . माया ने चार षटकात ३२ धावात ४ बळी घेतले. यात ९ निर्धाव चेडुंचा समावेश होता. आंध्र च्या ७३ धावांच्या सलामीनंतर माया ने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्र ला १३६ धावात रोखण्यात महाराष्ट्राला यश आले.
पण आंध्र ने महाराष्ट्राला ९ बाद ९५ असे रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – २१ एप्रिल मेघालय , २२ एप्रिल हैद्राबाद व २४ एप्रिल राजस्थान विरुद्ध.