सी के नायडू ट्रॉफीत तिसऱ्याच दिवशी सलामीवीरांची जोरदार फलंदाजी
नीरज जोशी नाबाद १३४ व अनिरुद्ध साबळे नाबाद ७४
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआय-च्या २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीत ,चार दिवसीय सामन्यात तिसऱ्याच दिवशी चहापानानंतर महाराष्ट्राने सौराष्ट्रवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
विजयासाठीचे २०८ धावांचे लक्ष्य महाराष्ट्राचे सलामीवीर नीरज जोशी व अनिरुद्ध साबळे यांच्या जोरदार फलंदाजीमुळे महाराष्ट्र संघाने ४९ व्या षटकातच एकही गडी न गमावता पार केले. डावखुरा नीरज जोशीने १४९ चेंडूत १९ चौकरांसह नाबाद १३४ धावा फटकावल्या. त्यास अनिरुद्ध साबळेने १४३ चेंडूत ८ चौकरांसह नाबाद ७४ धावा करून दमदार साथ दिली व तोपर्यंत अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्याचा निकाल अगदीच एकतर्फी करून टाकला.
त्याआधी सकाळी पहिल्या सत्रात सौराष्ट्रने दुसऱ्या डावात ५ बाद ६० वरून पुढे खेळताना, राजवर्धन हंगर्गेकरने लगेचच मौर्य घोगरीला शून्यावर बाद करून देखील, दुसऱ्या दिवसअखेर ३३ वर नाबाद असलेला यष्टीरक्षक फलंदाज भाग्यराज चुडासामाच्या ६६ धावांच्या जोरावर जवळपास दोन तासात २७ षटकांत अजून ७८ धावांची भर घालत सर्वबाद १३८ पर्यंत मजल मारली व महाराष्ट्राला चौथ्या डावात विजया साठी एकूण २०८ धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात देखील जलदगती हंगर्गेकरने ४ बळी घेत सामन्यात एकूण ८ बळी घेतले. तर डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम मैडने ३ – सामन्यात एकूण ७- , नीरज जोशीने २ व अब्दुस सलामने १ बळी घेतला.
उपहारापर्यंत सलामीवीर डावखुरा नीरज जोशी व अनिरुद्ध साबळेने सावधपणे खेळत ८ षटकांत बिनबाद २८ धावा केल्या. सौराष्ट्रने गोलंदाजीची सुरुवात फिरकीने केली.
उपहारानंतर दुसऱ्या सत्रात नीरज जोशी व अनिरुद्ध साबळेने आरामात खेळत दुसऱ्या डावातही अर्धशतकी पार सलामीची भागीदारी केली. १५ व्या षटकात बिनबाद ५३ – नीरज जोशी ३१* व अनिरुद्ध साबळे २२*. विजयासाठी महाराष्ट्राचे लक्ष्य अजून १५५ धावा दूर. त्यानंतर नीरज जोशीने आक्रमक पवित्रा घेत पुढच्या ४ षटकातच ६३ चेंडूत ७ चौकरांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. उपहारानंतर पहिल्या तासात महाराष्ट्राने अजून ६७ धावा जोडल्या – २२ षटकात बिनबाद ९५. पुढच्याच २३ व्या षटकात महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी या सामन्यातील पहिल्याच शतकी भागीदारीची नोंद केली – नीरज जोशी ६५ * व अनिरुद्ध साबळे ३५*- बिनबाद १०० – विजयासाठी अजून १०८ धावा. सौराष्ट्रच्या कोणत्याच गोलंदाजाला सलामीवीर नीरज जोशी व अनिरुद्ध साबळे यांनी दाद दिली नाही व धावफलक हलता ठेवला. अनिरुद्ध साबळेने दमदार साथ देत ९५ चेंडूत ५ चौकरांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानाच्या वेळेस महाराष्ट्राने ३६ षटकांत बिनबाद १५० धावा केल्या. नीरज जोशी ९३ वर तर अनिरुद्ध साबळे ५७ धावांवर नाबाद होते.
चहापानानंतर दुसऱ्याच षटकात मिड-विकेट ला चौकार ठोकत नीरज जोशीने आपले शतक पूर्ण केले. ११३ चेंडूत १५ चौकार.
सौराष्ट्रने एकूण आठ गोलंदाज वापरून बघितले. पण या सलामीच्या जोडीने त्यांना शेवटपर्यंत यश मिळू दिले नाही.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व इतर पदाधिकारी यांनी विजयी महाराष्ट्र संघ , मुख्य प्रशिक्षक निरंजन गोडबोले व इतर सर्वांचे खास अभिनंदन करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
संक्षिप्त धावफलक व निकाल –
सौराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद २५२ – मौर्य घोगरी ६१, शुभम मैड व राजवर्धन हंगर्गेकर प्रत्येकी ४ बळी
व दूसरा डाव – सर्वबाद १३८ – भाग्यराज चुडासामा ६६. राजवर्धन हंगर्गेकर ४ व शुभम मैड ३ बळी.
विरुद्ध
महाराष्ट्र पहिला डाव – सर्वबाद १८३ – सचिन धस ५१, मौर्य घोगरी व क्रेन्स फुलेत्रा प्रत्येकी ४ बळी.
व दूसरा डाव – बिनबाद २०८ .
महाराष्ट्र १० गडी राखून विजयी.