नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत, नाशिक जिल्हा महिला संघाने सांगलीवर मोठा विजय मिळवला.
या विजयात नाशिक तर्फे फलंदाजीत शाल्मली क्षत्रियने शतक झळकवले व तेजस्विनी बाटवालने ७७ धावा केल्या तर गोलंदाजीत प्रियांका घोडकेने ३ बळी घेत विजयात प्रमुख वाटा उचलला.
नाशिकने प्रथम फलंदाजी करत शाल्मली क्षत्रिय १०२ व तेजस्विनी बाटवाल ७७ धावा यांच्या जोरावर ७ बाद २६७ धावा केल्या. विजयासाठी २६७ धावांचा पाठलाग करणाऱ्या सांगलीला, नाशिकच्या गोलंदाजांसमोर सर्वबाद १४६ पर्यंतच मजल मारता आली. त्यात वैष्णवी शिंदेने सर्वाधिक ६१ धावा केल्या. यष्टीरक्षक तेजस्विनी बाटवालने २ यष्टीचीतसह ३ धावबाद करण्यात वाटा उचलत प्रभावी कामगिरी केली. गोलंदाजीत नाशिकतर्फे प्रियांका घोडकेने ३ तर रसिका शिंदे, लक्ष्मी यादव ,ऐश्वर्या वाघ व पूजा वाघने प्रत्येकी १ बळी घेऊन नाशिकला १२१ धावांनी विजयी करत मोठा विजय नोंदवला.