नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शाल्मली क्षत्रियने फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली. उपांत्य फेरीत शाल्मलीने महाराष्ट्र संघातर्फे तामिळनाडू विरुद्ध ४३ चेंडूत ४ चौकारांसह सर्वाधिक ३७ धावा केल्या. महाराष्ट्र संघाने दिलेले ९५ धावांचे लक्ष्य तामिळनाडूने ६ गडी गमावून पार केले. शाल्मलीने उपांत्य पूर्व फेरीत बंगाल विरुद्ध २२ चेंडूत २३, तर साखळी स्पर्धेत आसाम विरुद्ध केवळ १४ चेंडूत ३१ तर ओडिशाविरुद्ध १७ चेंडूत १७ अशी सातत्यपूर्ण कामगिरी करत महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हातभार लावला.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघ सदस्य अष्टपैलु शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. शाल्मली क्षत्रिय वेळोवेळी विविध वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आली आहे. तिची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी गेली काही वर्षे नियमित निवड होत आहे. मागील दोन्ही हंगामापासूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित स्पर्धेत शाल्मली १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत आली आहे. १९ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत २०२२-२३ च्या हंगामात महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता .
शाल्मली क्षत्रियच्या या कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी शाल्मली क्षत्रियचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.