नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने उस्मानाबादवर ६ गडी राखून विजय मिळवला.
मेरी १ क्रिकेट मैदानावरील दोन दिवसीय कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या उस्मानाबादने पहिल्या डावात अमेय फडच्या ५९ धावांच्या जोरावर सर्वबाद ११४ धावा केल्या. नाशिकच्या प्रणव पाटीलने ४ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिकने पहिल्या डावात आर्यन पवारच्या नाबाद ५५ धावांच्या जोरावर पहिल्या डावात आघाडी घेत ७ बाद १३० वर डाव घोषित केला. दुसऱ्या डावात नाशिकचे गोलंदाज प्रणव पाटील व देवांश गवळी यांनी प्रत्येकी ३ व राजवीर पाटीलने २ बळी घेत उस्मानाबादनला केवळ ६३ धावांत रोखले. नाशिकने विजयासाठीच्या ४८ धावा सामन्याच्या शेवटच्या तासात ४ गडी गमावून पार केल्या व लागोपाठ दुसरा विजय मिळवला.
एस एस के क्रिकेट मैदानावरील दुसऱ्या सामन्यात डी ए आर सी , पुणेने ऋषिकेश शिंदे व कृष्णा गायकवाड यांच्या डावात प्रत्येकी ५ बळी या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर पूर्व विभागावर १ डाव व १७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात मेरी २ क्रिकेट मैदानावर, जेट ७ स्पोर्ट्स पुणेने , आर्यन कित्तुरेचे शतक व फरहान मुल्लाचे सामन्यातील एकूण १० बळी या कामगिरीच्या जोरावर स्पोर्ट्समन , पुणे संघावर १ डाव व १११ धावांनी मोठा विजय मिळवला.