नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल ह्या दोन खेळाडूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित कोलकाता येथील वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या दोघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवाल या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सलामीची फलंदाज ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. २२ एप्रिल ते १६ मे २०२३ दरम्यान झालेल्या , महिलांच्या २३ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड झाली होती. याआधीच्या दोन हंगामात देखील एन सी ए कॅम्प तसेच बीसीसीआयच्या हाय परफॉरमन्स शिबिरासाठी देखील निवड झाली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्या स्पर्धेत श्रीलंका व वेस्ट इंडीज संघाविरुद्ध सामने झाले होते. १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे , जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे मागील हंगामात देखील महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती .त्यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते . तर तेजस्विनी बाटवाल यष्टीरक्षक व फलंदाज असून तिने देखील यापूर्वी महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वीच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेतील या खेळाडूंची सातत्यपूर्ण, लक्षणीय कामगिरी विचारात घेऊनच सदर निवड झाली आहे.
पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या १६सदस्य संघाची निवड घोषित केली असून, अनुजा पाटील हि कर्णधार आहे. कोलकाता येथे वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – १८ ऑक्टोबर छत्तीसगड, २० ऑक्टोबर उत्तर प्रदेश, २२ ऑक्टोबर अरुणाचल प्रदेश, २४ ऑक्टोबर विदर्भ, २६ ऑक्टोबर उत्तराखंड व २८ ऑक्टोबर कर्नाटक.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे मुली व महिला क्रिकेटपटूंसाठी साठी मोफत सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.
ईश्वरी सावकार व तेजस्विनी बाटवालच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी, तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोनही महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.