नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बातमी. नाशिकचा रणजीपटू सत्यजित बच्छावची, २०२२-२३ च्या हंगामाच्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे नव्या क्रिकेट हंगामाची सुरुवात दुलिप ट्रॉफीने होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग चमूत नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व भरवशाचा तळातील फलंदाज सत्यजित बच्छावची निवड झाली आहे. ही स्पर्धा सप्टेंबर ८ ते २५ दरम्यान चेन्नई , तामिळनाडू येथे खेळविली जाणार आहे. मागील तीन ,चार रणजी हंगामात, केलेल्या उत्कृष्ट, सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर सत्यजितची या अतिशय मानाच्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडु झालेला आहे व रणजी ट्रॉफी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी व एकदिवसीय विजय हजारे स्पर्धेत देखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहे.
प्रथम श्रेणी सामन्यांत, महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतांना सत्यजितने आतापर्यंत २६ सामन्यांत ९९ बळी घेतले आहेत. ह्यात एका सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम एकदा, डावात ५ बळी चारदा , तर सहा वेळा ४ गडी बाद करण्याची जोरदार कामगिरी नाशिकच्या ह्या डावखुर्या फिरकीपटुने केली आहे. त्याबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी आपला वाटा उचलला आहे. आतापर्यंत ६७ ह्या सर्वोच्च धावसंख्येसह चार अर्धशतके झळकावली आहेत.
मागील रणजी हंगामात रोहतक, हरियाणा येथे झालेल्या एलिट गटातील ग्रुप जीच्या सामन्यात सत्यजित बच्छाव ने आसाम विरुद्ध महाराष्ट्र संघातर्फे जोरदार अष्टपैलु कामगिरी करताना सामन्यात एकुण ११ बळी व ५२ धावा असे महत्वाचे योगदान दिले त्यामुळे महाराष्ट्र संघाने एक डाव व ७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. तसेच विदर्भाविरुद्ध च्या सामन्यात चिवट फलंदाजी – १६२ चेंडूत नाबाद ३६ धावा – केली , त्यामुळे महाराष्ट्र संघाला सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले. उत्तर प्रदेश विरुद्ध देखील सामन्यात एकूण ८ बळी घेत लक्षणीय कामगिरी केली.
याबरोबरच सत्यजितची आय पी एल २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे , महेंद्र सिंग धोनी च्या वलयांकित संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन त्यास संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते. आय पी एल २०२२ चा पूर्ण हंगाम सत्यजित चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर होता. २०२२ आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात सत्यजित समाविष्ट होता.
सत्यजितच्या या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यातील क्रिकेटविश्वात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या खास निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सर्वांनीच सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.