नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी अखेर राज्य सरकारने आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती केली आहे. तर, सध्याचे आयुक्त दीपक पाण्डेय यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हमून बदली करण्यात आली आहे. नाईकनवरे यांनी राज्याच्या विविध भागात विविध पदांवर काम केले आहे. त्यांचा मोठा अनुभव आहे.
दीपक पाण्डेय यांनी लेटरबॉम्बद्वारे राज्यात खळबळ उडवून दिली. राज्यातील महसूल विभागाचे अधिकार कमी करुन ते पोलिस आयुक्तांना देण्यात यावे, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली होती. तसेच, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी पंपचालकांनी नाशिक शहरात संप पुकारला. त्यातच पाण्डेय यांनी खासगी कारणास्तव राज्य सरकारकडे बदलीचा अर्ज केला होता. आता अखेर राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा जयंत नाईकनवरे यांच्याकडे देण्यात आली आहे.