नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक पोलिस आयुक्तालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी २३ मार्च आणि २ एप्रिल रोजी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्रे पाठविली होती. विशेष म्हणजे, ही पत्रे आयुक्तालयातून अनेकांपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सध्या आयुक्त पाण्डेय यांचा लेटरबॉम्ब प्रचंड चर्चेत आला आहे. तसेच, याप्रकरणी महसूल मंत्र्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल २० लाखांहून अधिक लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि तब्बल १३ पोलिस स्टेशनचा विस्तार असणाऱ्या पोलिस आयुक्तालयातून पत्रे बाहेर गेलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याच्या महसूल आणि पोलिस खात्यात खळबळ उडवून देणारी पत्रे आयुक्त पाण्डेय यांनी पोलिस महासंचालकांना पाठविली. मात्र, आयुक्तालयातील सुरक्षा भेदून ही पत्रे प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियात व्हायरल झाली. आयुक्तालयातूनच ही पत्रे बाहेर गेली की आयुक्तांचा ई मेलच हॅक करण्यात आला असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या पत्रामुळेच राज्याच्या महसूल विभागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करुन ते सर्व पोलिस आयुक्तांना द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळेच पोलिस आयुक्त पाण्डेय यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता महसूल संघटनांकडून होत आहे. राज्यात या पत्रापत्रीने वातावरण गरम झालेले असतानाच ही पत्रे लीक कशी झाली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याची दखल अखेर नाशिक पोलिस आयुक्तालयाने घेतली आहे. ही पत्रे बाहेर कशी उपलब्ध झाली याची चौकशी विशेष शाखेच्या पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासह अन्य कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तूर्त तरी पाटील यांच्या चौकशी आणि अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.