नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात गाजत असलेल्या भोंग्यांबाबत नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज आणखी नवे आदेश जारी केले आहेत. सोमवारी त्यांनी राज्यातील पहिला आदेश काढला होता. त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. आता त्यांनी दुसरा आदेश काढल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, आता भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. हे भोंगे उतरवा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात त्याची मोठी चर्चा होत आहे. त्याच अनुषंगाने नाशिक पोलिस आयुक्तांने आदेश काढले. त्यात म्हटले होते की, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मशिदींच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा पठण करण्यावर बंदी आहे. तसेच, येत्या ३ मे पर्यंत भोंगे लावण्यासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे, त्यानंतर आता आयुक्तांनी आदेश काढले आहेत की, ज्या मशिदींवर भोंगे लावले आहेत त्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) द्वारे ध्वनीमापक यंत्र वापरले जाणार आहेत. या यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता मोजण्याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या भोंग्यांची तीव्रता अधिक आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आता परवानगी घेऊनही मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणाऱ्यांना दंड आणि शिक्षा होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.