मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय आज तातडीने मुंबईत आले असून दिवसभर त्यांच्याशी निगडीत विविध घडामोडी घडच आहेत. आयुक्त पाण्डेय यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर, आयुक्त पाण्डेय हे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी मुंबईत आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पत्राप्रकरणी गृहविभागाने पाण्डेय यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्याचा खुलासा आता त्यांना करावा लागणार आहे.
पोलिस आयुक्त पाण्डेय सध्या राज्यभरात चर्चेत आहेत. दुचाकीवरील दोघा व्यक्तींना हल्मेट सक्ती, हेल्मेट नसलेल्या व्यक्तीला पेट्रोल दिल्याने पेट्रोल पंप चालकांना नोटिसा आणि नंतर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तसेच लेटरबॉम्ब अशा तीन कारणांमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. यातील लेटरबॉम्बचा मुद्दा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलाच गाजला. एखादा पोलिस अधिकारी अशा प्रकारचे पत्र कसे लिहू शकतो, असा सवालच अजित पवार यांनी उपस्थित केला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे अधिकार काढून ते पोलिस आयुक्तांना देण्याची मागणी पाण्डेय यांनी या पत्रात केली होती. तसेच, जिल्हा दंडाधिकारी योग्य पद्धतीने काम करीत नसल्यानेच भूमाफीयांचे फावल्याचे पाण्डेय यांनी पत्रात नमूद केले होते. अशा पद्धतीचे स्फोटक पत्र व्हायरल झाले. त्याचे मोठे पडसाद राज्यात उमटले आहेत. महसूल संघटनांनी पाण्डेय यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता पाण्डेय हे मुंबईत दाखल असून ते थोड्याच वेळात संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सध्या पाण्डेय यांच्याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.