नाशिक – कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणावर भर देवून लसीकरणाची गती वाढविण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरण शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. १४ लाख जणांनी (२० टक्के) पहिला डोस घेतला आहे. तर ७ टक्के जणांनी २ डोस घेतले आहेत. एकूण २७ टक्के लसीकरण नाशिकमध्ये झाले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. जर कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर लसीकरणावर भर द्यायला हवा, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी त्यातील अनेक रुग्ण आता बरे झाले आहेत. परंतू कोरोनाशी संबंधित असणाऱ्या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी वेळीच नियंत्रण आणने आवश्यक असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्यात येवून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील डेल्टा तपासणी करण्यात येवून संबंधित रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करावेत. कोरोना व त्यासंबंधिच्या विविध विषाणुंचा सामना करण्यासाठी वेळीच लसीकरण केल्यास नागरिकांची प्रतिकार शक्ती निश्चितच वाढण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
विषाणू कोणताही असो त्यापासून स्वत: सोबत आपल्या कुटूंबाचा व निकटवर्ती यांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे देखील गरजेचे आहे. याअनुषंगाने कोरोनाची भिती पूर्णत: संपलेली नसल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करतांना सांगितले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात 24 व शहरी भागातील 13 ठिकाणी अशा एकूण 37 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांचे काम 31 ऑगस्ट अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीवर भर देण्यात यावा, या राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील 23 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे सिव्हिल काम पूर्ण झाले असून 12 प्रकल्पांचे स्थापित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मीतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण होऊन आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिव्हिटी दर आता अत्यल्प झाला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार 59 रुग्णांवर उपचार घेत आहेत, असे जिल्हाधिकरी श्री. मांढरे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.