विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांचा लसीकरणाकडे मोठा कल आहे. अशातच लसीचा पुरवठा ही बाब अतिशय कळीची झाली आहे. नाशिक शहरात शनिवार आणि रविवार (८ व ९ मे) लसीकरण मोहिम बंद होती. त्यामुळे १८ ते ४४ आणि ४५ वर्षे वयापुढील सर्व नागरिकांना लस मिळालेली नाही. त्यातच आता सोमवार (१० मे)च्या लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका प्रशासनाने सांगितले आहे की, सोमवार (१० मे) रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही निश्चित केलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यायचे आहे.नोंदणी करून आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
तर, सोमवार (१० मे) रोजी मनपा हद्दीतील ४५+ वयोगटातील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येत की, उद्या सर्व लसीकरण केंद्रावर ४५+ वयोगटातील लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. लस उपलब्ध झाल्यानंतर त्या संदर्भात कळविण्यात येईल. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.