नाशिक – शहरासह जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा आणि तिसऱ्या लाटेची तयारी यासंदर्भातील बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी विविध प्रकारचे निर्देश दिले. पालकमंत्री म्हणाले की, काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक परिस्थिती आहे.ही रुग्णसंख्या अजून कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर लक्षात घेता टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प सुरू झाले असून आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगच्या कामात ज्या जबाबदार यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लसीकरणाचे वाढते प्रमाण समाधानकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह आरोग्य व अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.