नाशिक – शहरासह जिल्ह्यात हळूहळू कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच, ओमिक्रॉन या अवताराचीही भीती आहे. याची दखल घेत आता कठोर निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लसीकरण सुरू असले तरी त्याला फारसा प्रतिसाद नाही. पहिला डोस घेतलेल्या अनेकांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविली आहे. याची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आता कठोर निर्णय जाहीर केला आहे. लस न घेतलेल्यांना अनेक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून (२० डिसेंबर) हा नियम लागू होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज नाशिक कोरोना आढावा बैठक संपन्न झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे गेल्या काही आठवड्यांपासून ही बैठक झाली नव्हती. आज ही बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक आदी उपस्थित होते. बैठकीत कोरोना संसर्ग, ओमिक्रॉन आणि लसीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी त्याचे सादरीकरण केले.
बघा मनपा आयुक्तांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/445648763792651/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing
बैठकीत झालेला निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सरकारी कार्यालय, निमसरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज, मॉल्स, औद्योगिक वसाहत, बाजारपेठ, बँका आदी ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉन हा वेगाने संक्रमित करतो. त्यामुळे कुठलीही बेफिकीरी घेऊन चालणार नाही. आपल्याला दक्ष रहावे लागेल. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही ती घेतली जात नाही. त्यामुळे आता लसीकरणावर भर द्यायला हवा, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंध आता कुणालाही नको आहेत. त्याने काय होते हे सर्वांनी अनुभवले आहे. म्हणूनच लसीकरण घ्या, कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा, असा सल्ला पालकमंत्र्यांनी दिला आहे.
बघा पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/665548201277346/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C