नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यासंदर्भात येत्या सोमवारी (३१ जानेवारी) निर्णय होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध लागू केले आहेत. सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, ज्या गतीने बाधितांच्या संख्येत वाढ होती त्यात आता स्थिरता आणि काही ठिकाणी हा वेग काहीसा कमी झाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत तुरळक आहे. त्याचबरोबर लस घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सद्यस्थितीतील कोरोना आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आदी यात उपस्थित राहणार आहेत.