नाशिक – शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारने जाहीर केलेले निर्बंध नाशकात लागू करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसात नाशिकमधील कोरोना बाधितांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बाधितांचा आकडा १ हजारांच्या पुढे गेला आहे. आज दिवसभरातही तिनशेहून अधिक नवे बाधित आढळले आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (६ जानेवारी) दुपारी नाशिक कोरोना आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये कोरोना बाधितांची प्रचंड संख्या वाढत असल्याने तेथे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच धर्तीवर आता नाशकातही निर्बंध वाढणार की अन्य काही निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये लसीकरण सुरू असले तरी त्याचा वेग कमी आहे. लस नाही तर प्रवेश नाही ही मोहिमही हाती घेण्यात आली आहे. मात्र, लसीकरणाला अद्यापही मोठा वेग आलेला नाही. नाशिक महापालिकेने आता २४ तास लसीकरण केंद्र कार्यन्वित केले आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याबाबत या बैठकीत मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.