नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांमध्ये काहीशी शिथीलता देण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर लावण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध लागू केले आहेत. सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, ज्या गतीने बाधितांच्या संख्येत वाढ होती त्यात आता स्थिरता आणि काही ठिकाणी हा वेग काहीसा कमी झाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत तुरळक आहे. त्याचबरोबर लस घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सद्यस्थितीतील कोरोना आढावा या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले की, नाशिकमधील रुग्णसंख्या १८ हजारावरून १५ हजारांवर आली आहे. ३ हजाराने रुग्णसंख्या घटली आहे. रुग्ण बाधित होण्याचा दर पॉझिटिव्ह रेट ४१ टक्क्यांहून २७ टक्क्यांवर आला आहे, ही दिलासादायक बाब आहे. म्युकरमायकोसिसचा शहरात किंवा जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्याप कुठेही मुले बाधित झाल्याचे आढळून आलेले नाही, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ पुढे म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. खासकरुन मालेगाव, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन पाठविण्यात येत आहे. मालेगाव मध्ये लसीकरण कमी असल्याने याठिकाणी लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लस आता खुल्या बाजारात म्हणजे मेडिकल दुकानातही मिळणार आहे. त्यामुळे सरकारकडून भविष्यात लस मोफत मिळणार नाही. त्यामुळे मोफत लस लवकरात लवकर घेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात येत आहेत. मात्र, याठिकाणी कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन वसतीगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आदी यात उपस्थित राहणार आहेत.