नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध वाढविण्यात येणार आहेत. नाशिक कोरोना आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे आणि तशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्यानुसार, उद्या (१८ जुलैपासून) शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरुपाचे राजकीय, सामाजिक, शासकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. परिणामी, मोर्चे, आंदोलने व निदर्शने याला परवानगी असणार नाही. तसे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. व्यापारी संघटनांनी दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात पालकमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे दुकानांची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंतच असणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी (विकेंड) असलेला लॉकडाऊन कायम राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटनस्थळांवर गर्दी होत असल्याने या ठिकाणी कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनस्थळांवर जाणाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्देशानंतर जिल्ह्यात ३३५ गावांमधील २९६ शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच शाळा सुरू झाल्या आहेत. या सर्व ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात आहेत. यापुढेही पाळले जातील. तसेच, कोरोनामुक्त गावांचा आढावा घेऊन त्या गावातील शाळा सुरू केल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.