नाशिक – शहरासह जिल्ह्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमध्ये काहीशी सूट देण्याबाबत कोरोना आढावा बैठकीत एकमत झाले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक संपन्न झाली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. त्याची दखल घेत निर्बंधांमध्ये नक्की काय आणि किती शिथीलता द्यायची याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शनिवार किंवा रविवारचे कोरोना निर्बंध हटविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन आहे. या दोन्ही दिवशी केवळ जीवनावश्यक सेवांनाच परवानगी आहे. मात्र, आता आठवड्यातून सहा दिवस सर्व व्यवहार पूर्ण सुरू ठेवणे आणि केवळ एक दिवस कडक लॉकडाऊन ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. म्हणजेच, सहा दिवस दुपारी ४ पर्यंत व्यवहार सुरु राहू शकतात. तसेच, जर सध्या सुरू असलेले पाच दिवसांचे निर्बंध कायम ठेवून वेळेबाबत एक ते दोन तासांची सूट देता येईल का, याबाबतही चर्चा करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना स्थिती पाहता केवळ एक दिवस कडक लॉकडाऊन ठेवावा आणि सहा दिवस व्यवहार सुरळीत ठेवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकंमत्र्यांनी दिले आहे. तसेच, हा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सकडे पाठविण्यात येणार आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर नाशिकच्या कोरोना निर्बंध शिथीलता येणार आहे. बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.