नाशिक – कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने विविध कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (२० ऑक्टोबर) विविध कॉलेजेस तर येत्या २२ ऑक्टोबरपासून सभागृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य शासनाने कोविड संदर्भात घेतलेले सर्व निर्णय जसेच्या तसे नाशिक जिल्ह्यामध्ये लागू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कॉलेज सुरू करणे संदर्भातील हा शासन निर्णय सुद्धा आपल्या जिल्ह्यात जसाच्या तसा लागू होणार आहे. यामध्ये विद्यापीठे तसेच कॉलेजेसवर, प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात काही निर्बंध टाकण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचे परिपूर्ण रित्या पालन करण्यात यावे असे संबंधितांना निर्देश आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.