नाशिक – सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत काटेकोर नियमांचे पालन केल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गावे कोरोना मुक्त झाली. परंतु आता याच गावांमध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. ज्या गावांमध्ये कोरोनाचा एक रुग्ण नाही, अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि ग्रामसभेच्या मान्यतेने सुरू करण्यात येतील, अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. मात्र आता अनेक गावांमध्ये पुन्हा रुग्ण आढळून आल्याने शाळा प्रत्यक्षपणे सुरू करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, २३ जून रोजी १९२७ खेड्यांपैकी १,३३७ गावे कोविडमुक्त झाली होती. मात्र आता या गावांमध्ये पुन्हा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील अनेक गावात कोविडचे रुग्ण आढळले. ही गावे यापूर्वी कोविडमुक्त घोषित करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकीकडे राज्य सरकार कोविडमुक्त गावांची संख्या वाढावी, आणि जनजीवन पूर्ववत सुरू होऊन शैक्षणिक संस्थाही सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसरीकडे विवाह सोहळे, अन्य धार्मिक मेळावे, सामाजिक समारंभ, वारंवार प्रवास करण्याची मानसिकता वाढण्यासह इतर अनेक कारणांमुळे संसर्ग पसरला आहे.
जिल्ह्यात ११ जुलै रोजी एकूण १,२४६ गावे कोविडमुक्त होती, म्हणजेच २३ जूननंतर ९१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये म्हणाले की, सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील गावांमध्ये कोरोनोचा रुग्विण आढळत आहेत.
सिन्नरमधील ५६ कोविडमुक्त गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा सुरू झाला आहे. जिल्हयातील ३५ गावांनी कोविडमुक्त टॅग गमावला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा संसर्ग वाढण्याची भिती आहे. विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांमुळेच संसर्ग वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी सांगितले की, कोविडमुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या योजनेवर परिणाम झाला आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ कोविड-मुक्त गावांची आम्ही माहिती घेत आहोत. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर बैठक होईल. आणि शाळा उघडण्याचा निर्णय घेतला जाईल.