नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. भटू शांताराम गोसावी (३५ रा. सिध्दीविनायक मंदिराजवळ, राज्य कर्मचारी वसाहत) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना गेल्या २४ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला प्रथम वर्ग न्यायालय क्रमांक ५ चे न्या. एस.आर.कुलकर्णी यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड.एफ.एल.शेख यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
२४ जानेवारीची घटना
२४ जानेवारी रोजी रात्री पीडिता आपल्या घरात झोपलेली असतांना संशयिताने हे कृत्य केले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदार अनिल आहेर यांनी गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.