नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खूनासह खूनाच्या प्रयत्नाच्या वेगवेगळ्या गुन्ह्यामधील दोन टोळ्यांमधील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात जया दिवेसह सागर जाधव यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या या घटनाचा निकाल मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. टोळी युध्दातून पंचवटीत झालेल्या किरण निकम याचा खून आणि त्यानंतर खंडणीची मागणी करीत संदिप लाड याच्यावर झालेला गोळीबाराचा हे खटले होते.
जुन्या वादाची कुरापत काढून दुचाकीवर प्रवास करणा-या किरण राहूल निकम या गुन्हेगारावर तब्बल १०१ सपासप वार करुन टोळक्याने हत्या केली होती. ही घटना १८ मे २०१७ रोजी नवनाथ नगर भागात घडली होती. याप्रकरणी आरोपी गणेश अशोक उघडे (वय ३०), जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक (३७), संतोष विजय पगारे (३६), संतोष अशोक उघडे (३२, रा सर्व. पंचवटी) यांना जन्मठेपेसह प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली. याच प्रकरणात जया दिवेसह सागर जाधवची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मयत किरण निकम (३६) हादेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. पंचवटी पोलिसांत त्याच्याविरुद्ध खून, खंडणी, अपहरण, हाणामारीचे गंभीर गुन्हे दाखल होते. एका खून खटल्यात तो निर्दोष सुटला होता. पण, वर्चस्ववादातून उघडे गटाशी त्याचे वैर वाढले. त्यातून १८ मे २०१७ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पंचवटीतल्या नवनाथ नगरात त्याला आरोपींनी अडवले. निकमवर धारधार शस्त्राने १०१ वार करत मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला.
याप्रकरणात १६ साक्षीदार तपासण्यात आले. तर, जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. व्ही. पवार यांनी महत्त्वाची साक्ष दिली. आरोपींच्या हातातील शस्त्रामुळे जखमा झाल्याने किरण मयत झाला. यासह इतर साक्षीपुराव्यांनुसार अंतिम निकाल देण्यात आला. सागर जाधव हा या हत्येचा मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी तपासात नमूद केले होते. परंतु, जया दिवेसह सागरला कोटार्ने निर्दोष मुक्त केले.
दुसरी घटना पेठरोडवरील बच्छाव हॉस्पिटल परिसरात घडली होती. २९ जून २०१७ रोजी किरण निकमच्या भावांनी संदीप लाड याच्याकडे खंडणी मागत त्याच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी आरोपी शेखर राहुल निकम (वय २७) आणि केतन राहुल निकम (१९) यांना खूनाच्या प्रयत्नात जन्मठेपेसह प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालय क्र.५ चे न्या.व्ही.पी.देसाई आणि नाशिक न्यायालयातील विशेष मोक्का न्यायाधीक्ष आदिती कदम यांनी या दोन्ही प्रकरणाचा अंतिम निकाल दिला.
दोन्ही प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी एम. एम. पिंगळे, सहायक उपनिरीक्षक के. के. गायकवाड यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला. मयत किरण निकमच्या मारेक-यांसारखा दिसतो, असे समजून त्याच्या भावांनी नाहक एका शालेय विद्याथ्यार्ची हत्या केली होती.
त्यानंतर आरोपी शेखर निकम, केतन निकमसह संशयित संतोष पवार, विशाल भालेराव, संदिप पगारे यांनी संदीप लाड याच्याकडे खंडणी मागितली. लाड हा उघडे गटाशी संलग्न होता. त्याचा किरणच्या हत्येशी संबंध असावा, असा आरोपींचा राग होता. खंडणी न दिल्याने आरोपींनी संदीपवर गोळी झाडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. २९ जून २०१८ रोजी दुपारी एका हॉटेलात हा प्रकार घडला.
तेव्हा, शेखरवर ९, तर विशाल भालेराववर १४ गुन्हे दाखल होते. गोळीबारानंतर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान दोन्ही प्रकरणांचा मंगळवारी फैसला असल्याने जिल्हा न्यायालयात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
Nashik Court Punishment Murder 5 Convicts