नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरगुती वादातून प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देत जीवे ठार मारल्याप्रकरणी प्रवीण कृष्ण डोईफोडे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालय (क्रमांक ५) न्यायाधीश आर.आर. राठी यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला. ८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली होती.
सरला उर्फ सारीका बाबासाहेब गायकवाड व प्रविण कृष्ण डोईफोडे हे प्रेमसंबंधातून एकत्र रहात होते. आडगाव मेडीकल कॉलेजमागील कैलास दुशिंग यांच्या खोलीत भाडेकरू होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. त्यातून प्रवीणने सारीकाच्या अंगावर डिझेल ओतले. तिचा भिजलेला ड्रेस फाडून गॕसवर धरला. त्यामुळे आग भडकल्याने ती गंभीर जखमी झाली. प्रवरा रुरल हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना तिचे निधन झाले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात खूनाचा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक दिनेश मुळे यांनी केला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय (क्रमांक ५) येथे झाली. सुनावणी दरम्यान फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष तसेच परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस जन्मठेप व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.