नाशिक – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संशयातून युवकास मारहाण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.वाघवसे यांनी तिघांना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०१६ मध्ये औद्योगीक वसाहतीतील आनंद छाया बसस्टॉप भागात ही घटना घडली होती. या घटनेत मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यु झाल्याने सातपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्चना किशोर जाधव (२८), संजय वसंत जाधव (३४) व महेश अरुण खिराडकर (२७, तिघे रा. सातपूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सातपूर येथील आठ हजार कॉलनी परिसरात ४ डिसेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयातून तिघांनी कुटूंबियास दमदाटी करीत सुशांत गजानन बच्छाव (२०, रा. राजाचे कौळाणे, ता. मालेगाव) यास बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुशांतचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक जे. जी. गायकवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. जी. कडवे यांनी कामकाज पाहिले. युक्तीवाद केला. आरोंपीविरोधात साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सुशांत यास मारहाण केल्याप्रकरणी तिघांनाही पाच वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार डी. एस. काकड, पी. व्ही. पाटील, पोलिस नाइक एस. यु. गोसावी आदींनी कामकाज पाहिले.