नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांना नाशिकक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कृषी उपन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम अपहार केल्या प्रकरणी न्यायालयाने पिंगळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, या निकालामुळे लाचलुचपत विभाग मात्र तोंडघशी पडला आहे. विभागाला योग्य पुरावेही सादर न करता आल्याने पिंगळे यांची सुटका झाल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या सहा वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने हा खटला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्याची आज सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला मात्र, सबळ पुरावा नसल्याचे सांगत न्यायालयाने पिंगळे यांच्यासह लिपिक दिनकर हिरामण चिखले, लेखापाल अरविंद जैन, लिपीक विजय निकम यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर पिंगळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. अतिशय सूडबुद्धीने तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयात अखेर खोटेपणा सिद्ध झाला आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्याचा विजय होतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे.