नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जिल्हा व सत्र न्यायालयाने साडे तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. पवन लहू महाले (रा.नळवाडपाडा ता.दिंडोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी दिंडोरी तालूक्यातील नळवाडपाडा भागात ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह अनैसर्गिक कृत्य आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.व्ही.घुले यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. दिपशिखा भिडे व लीना चव्हाण यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले पुराव्यास अनुसरून आरोपीस बलात्कारासह अनैसर्गिक कृत्य आणि पोस्को कायद्यान्वये २० वर्ष सक्तमजूरी व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
१ जून २०२२ रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने शेजारी राहणा-या साडे तीन वर्षीय मुलीस झाडावरील चिंचा तोडून देण्याचा बहाणा करून परिसरातील शेतात उचलून नेले होते. निर्जनस्थळी मुलगी विव्हळत असतांना मिळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. मात्र तत्पूर्वीच आरोपी पसार झाला होता. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालिन निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कौटे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते.
तत्कालीन उपनिरीक्षक अजय कौटे,अमोल पवार हवालदार टी.बी.जाधव,पोलिस नाईक धनंजय शिलावट,शिपाई प्रसाद सहाणे,अविनाश आहेर व रविंद्र चव्हाण आदींच्या पथकाने नजीकच्या जोरणपाडा येथे सापळा लावून आरोपीला गजाआड केले होते. दरम्यान या खटल्यात दोषसिध्द झाल्याने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपासी पथकास दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
incident in Dindori; 20 years of hard labor for the accused of raping a little girl