नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मद्यधुंद अवस्थेत भावावर प्राणघातक हल्ला करून भावजयीस धारदार चाकू खुपसून ठार मारणाऱ्या दिरास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना रामनगर परिसरातील मोरे मळा भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खूनासह प्राणघातक हल्ला आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल पांडूरंग पाटील (३७ रा.चव्हाण चाळ समोर, मोरेमळा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोरेमळा भागात पाटील कुटूंबिय एकत्रीत राहतात. आरोपी यास दारूचे व्यसन होते. कुठलाही कामधंदा न करता तो मद्याच्या नशेत राहत असे. दि.२ जून २०२० रोजी ही घटना घडली होती. अनिल पाटील हा नेहमीप्रमाणे मद्याच्या नशेत घरी येवून त्याने आपल्या आईशी वाद घातला. त्यानंतर आई कामावर निघून गेली असता पत्नी व भावजयी ज्योती पाटील यांनी त्यास समजून सांगिण्याचा प्रयत्न केला असता हा हल्ला झाला होता. संतप्त पाटील याने शिवीगाळ करीत घरातील किचनमधून धारदार चाकू आणत थांब तुला दाखवतो असे म्हणत ज्योती पाटील यांच्या छातीत चाकू खुपसला होता.
यावेळी ज्योती पाटील यांचे पती सुनिल पाटील हे आपल्या पत्नीच्या बचावासाठी धावून आले असता त्यांच्यावरही आरोपीने चाकूने वार करीत जखमी केले होते. दोघा पती पत्नीस आरोपीच्या पत्नीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता ज्योती पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुनिल पाटील (३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात खूनासह प्राणघातक हल्ला व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक अशोक साखरे यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.डी.जगमलाणी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड दिपशिखा भिडे यांनी तेरा साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंड तर भादवी कलम ३२४ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
Nashik Court Crime Murder Convict Sentence