नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात घुसून ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका तडिपारास चौदा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना गेल्या वर्षी वडाळागावातील सादिकनगर भागात घडली होती. या घटनेत आरोपीने पिडीतेस बेदम मारहाण केल्याने महिला जखमी झाली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
शौकत सुपडू शहा (३० रा. गल्ली नं. २ सादिकनगर वडाळागाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कादरीनगर भागातील पीडितेने फिर्याद दिली होती. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास महिला आपल्या घरात असतांना तडिपार असलेल्या आरोपीने लाथ मारून महिलेच्या घरात प्रवेश केला होता. यावेळी त्याने प्रेमाची मागणी घालत महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध करीत आरडाओरड केली असता आरोपी शौकत शहा याने तिला मारहाण करून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेचे दोन्ही हात पकडून ओढतांना बांगड्या फुटल्याने ती जखमी झाली होती. महिलेचा आवाज ऐकुण परिसरातील महिलानी मदतीसाठी धाव घेतली असता शहा याने त्यांना शिवीगाळ करीत तूम्ही आमच्यात पडू नका नाही तर तुम्हाला पण सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर पीडितेने पोलीसात धाव घेतल्याने याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास तत्कालीन हवालदार एम.एम.शेख यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात दाखल केले होते. हा खटला कोर्ट क्र. १३ च्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम.माळी यांच्या समोर चालला. सरकार तर्फे अॅड. पिंकी दंदी यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी शौकत शहा यास एक वर्ष व दोन महिने सश्रम कारावास व ३५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.