नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मृत्यूची नोंद करुन त्याचा दाखला देण्यासाठी लाच मागणारा लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. या लाचखोर ग्रामसेवकाचे श्रावण वामन वाघचौरे (वय ५२ वर्ष) असे आहे. तो दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे अतिरिक्त कार्यभार ग्रुप ग्रामपंचायत रामशेज आशेवाडी येथील कारभार पाहतो. त्याला ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एका व्यक्तीच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आईचे मृत्यूप्रमाणपत्र मिळावे म्हणून त्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. हे प्रमाणपत्र देण्यासाठी लाचखोर वाघचौरे याने ६०० रुपयांची लाच मागितली. अखेर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाली. एसीबीच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक एन. एस. न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने सापळा रचला. या पथकामध्ये पोलिस नाईक मीरा आदमाने, पोलिस नाईक प्रवीण महाजन, अजय गरुड, चालक परशुराम जाधव यांचा समावेश होता. या पथकाने सापळा रचून वाघचौरे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे नाशिक एसीबीने म्हटले आहे.
Nashik Corruption Bribe ACB Gramsevak Trap