नवी दिल्ली – नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे ३० रुग्ण आढळल्याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली आहे. डॉ. पवार यांचा मतदारसंघ हा दिंडोरी असून त्यांच्या मतदारसंघातही डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. यासंदर्भातील इंडिया दर्पण मधील वृत्त वाचून डॉ. पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना संपर्क केला. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. पवार यांना दिली.
नाशिकमधील डेल्टा व्हेरिएंटचे सर्व रुग्ण सध्या बरे झाले आहेत. पुणे येथून तपासणी अहवाल जवळपास दीड महिन्यांनी प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हेच आवश्यक आहे. तीच बचावाची खरी सूत्री आहे. तसेच, प्रशासनानेही या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेणे, त्यांची तपासणी करणे आणि लसीकरणावर भर देणे यावर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही डॉ. पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. तशी माहिती डॉ. पवार यांनी इंडिया दर्पणशी बोलताना दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशभरातील कोरोना स्थितीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन आहे. खासकरुन कोरोनच्या नव्या अवतारांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे कुठलाही हलगर्जीपणा खपवून न घेण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. तसेच, केंद्राने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही सूचना देण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले आहे.
—
नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मास्क घालणे, लस घेणे, सतत हात धुणे याची काळजी नागरिकांनी घ्यावी तर, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी आणि लसीकरण वाढविणे ही प्रशासनाने घ्यावयाची खबरदारी आहे.
– डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री