नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हा तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना सापडल्याने नाशिकचा सहकार विभाग राज्यभरातच चर्चेला आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या अडीच महिन्यात सहकार विभागामध्ये ३ सापळे लावले. ते यशस्वी झाले असून त्यात तब्बल ६ जणांना रंगेहाथ पकडले आहे. सहकार विभागात हजारो आणि लाखोंच्या डील सतत होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.
सतीश खरेचा कारभार
जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे यांना काल रात्री तीस लाख रुपये लाच स्विकारताना त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली. खरे यांच्या घराच्या झडतीत १७ लाखांची रोकड व ४५ तोळे सोने यांसह अनेक संशयास्पद वस्तु सापडल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकचे जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे याच्या कॉलेजरोड येथील आलिशान फ्लॅटमध्ये एसीबीने तपासणी केली. त्यात पोलिसांना १७ लाखांचे रोकड आणि ४५ तोळे सोने तसेच विविध संशयास्पद साहित्य सापडल्याची चर्चा आहे. खरे याच्यासोबतच वकील शैलेश सुमातीलाल साभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) याच्यावरही एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट साभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते.
२० लाख घेताना तालुका सहायक निबंधक
नाशकातील तालुका सहायक निबंधकच तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाला २९ मार्च रोजी रंगेहाथ सापडला. या लाचखोरीत तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग होता. त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव रणजित पाटील असे आहे. सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक प्रवीण अर्जुन वीरनारायण याचाही सहभाग होता. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
एसीबीच्या पथकाने थोड्याच वेळापूर्वी सापळा रचला. या सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपीक वीरनारायण हे अडकले आहेत. त्यांनी २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला.
सिन्नरचा सहाय्यक निबंधकही जाळ्यात
सिन्नर सहकारी संस्थेचा सहाय्यक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात २ मार्च रोजी सापडला होता. एकनाथ प्रताप पाटील (वय ५७) असे लाचखोराचे नाव आहे. १५ हजार ५०० रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाथरे बुद्रुक येथे ई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. पतसंस्थेने अनेक कर्जदारांना कर्ज दिले आहे. त्यातील काही कर्जदारांनी कर्जाचे हप्ते थकवले आहेत. त्यामुळे पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावण्यासाठी कलम १०१ चे प्रमाणपत्र सहकारी संस्था निबंधकांकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी लाचखोर पाटील याने पतसंस्थेच्या वसुली विभागातील कर्मचाऱ्याकडे लाच मागितली. एका नोटीसचे १५०० रुपये असे १७ नोटीसचे एकूण २५ हजार ५०० रुपयांची लाच हवी असे लाचखोर पाटीलने स्पष्ट केले. याप्रकरणी अखेर एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर पाटील हा १५ हजार ५०० रुपये घेताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी एसीबीने पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Cooperative Department Bribe Corruption