नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ग्राहक न्याय मंचाने देवळाली कॅम्पमधील बार्न्स स्कूलबाबत अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नका, असे शाळेने बजावल्याने पालकांनी ग्राहक न्याय मंचात दाद मागितली आहे. याप्रकरणी आता मंचाकडून येत्या १७ मे रोजी अंतिम सुनावणी करणार आहेत. त्यामुळे त्यात काय निर्णय दिला जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अॅड उमेश वालझाडे आणि योगेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कूल मध्ये सहा वर्षांचा एक विद्यार्थी इयत्ता पहिलीत शिकत होता. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने घरुनच त्याचे शिक्षण सुरू होते. आता शाळा सुरू झाल्याने तो शाळेत जाऊ लागला. मात्र, कुतुहलापोटी या विद्यार्थी सर्व वर्ग उत्साहाने बघत होता. मात्र, शाळेच्या शिक्षकांनी त्याच्या या कुतुहलाचा विषय थेट स्पेशल चाईल्ड असे संबोधून गंभीर केला. तुमचा मुलगा स्पेशल चाईल्ड सारखा वागत असल्याचे शिक्षकांनी पालकांना कळविले. तेवढ्यावरच हे थांबले नाही तर, तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका. त्याला आम्ही मार्गदर्शन करु शकत नाही, असेही सांगितले. त्याचा मोठा परिणाम, त्या विद्यार्थ्याच्या पालकांवर झाला. यासंदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाची पुन्हा भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर पालकांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचात धाव घेतली आहे. मंंचचे अध्यक्ष मिलींंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा कुलकर्णी यांच्या समोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यांनी शाळेला मनाई हुकुम बजावला आहे. तसेच येत्या १७ मे रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.