नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाफेडमध्ये सुरू असलेल्या कांदा भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीवर गंडा घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करत आज नाशिकमध्ये काँग्रेसने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी नाफेडच्या आधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये खासदार शोभाताई बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, ,काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उदगी, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश काँग्रेसचे सचिव मोहन तिवारी, प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी सर्वांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम आवाज उठवला गेला. कांद्याला तातडीने हमीभाव द्या, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा या मागण्या करण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. दर घसरले, उत्पादन खर्च वाढला, आणि या अन्यायामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त व्हावं लागत असल्याचेही यावेळी मोर्चेक-यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकार कडून शेतकऱ्यांची उघड छळवणूक चालली आहे. शेतकरी कर्जात, कष्टात आणि नैराश्यात आहे. अशा परिस्थितीत आम्ही काँग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरलो आहोत. शेतकऱ्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.