नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाचवेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना XUV कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह इतरांसाठीही आनंद आणि प्रेरणादायी ठरली आहे.
दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा XUV ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दीपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
यासंदर्भात आव्हाड म्हणाले की,”माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज ७५० लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला १०० दिपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू. असे मला वाटते.”
महिंद्रा XUV कारची किंमत १२ लाख ६० हजार रुपये एवढी आहे. १२ कर्मचाऱ्यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. नाशिकमध्येच निर्मिती होणाऱ्या महिंद्रा कारचीच निवड करण्यात आली. म्हणजेच, नाशिकच्याच डेअरी पॉवर कंपनीने नाशिकमध्येच उत्पादित होणाऱ्या महिंद्रा कंपनीची कार नाशिकच्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. महिंद्राचे डीलर असलेल्या जितेंद्र ऑटोमोटिव्ह या शोरुममध्ये छोटेखानी कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला. त्यात या कर्मचाऱ्यांना ही कार गिफ्ट देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांमध्ये प्रचंड आनंद आणि समाधानाचे वातावरण होते.
Nashik Company Gift 12 XUV Car to Employees Dairy Power Mahindra XUV 300