नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवर असलेल्या एका कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या हेस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. गौरव बोरसे (वय २१ वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. बीकॉमच्या तृतीय वर्षात तो शिक्षण घेत होता. आणि गंगापूररोडवरील एका होस्टेलमध्ये राहत होता. तो मूळचा सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील आहे. त्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरवने आत्महत्या केल्याची बाब होस्टेलसह त्याच्या कॉलेजमध्ये आज सकाळीच उघडकीस आली. होस्टेलमध्ये शेजारच्या रुममधील एक विद्यार्थी गौरवच्या रुममध्ये गेला. त्यावेळी त्याच्या निदर्शनास आले की, गौरवने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर ही बाब होस्टेलच्या व्यवस्थापनासह पोलिसांना देण्यात आली. गौरवने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. त्याने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याची पडताळणीही पोलिस करीत आहेत. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा होस्टेलमध्ये आला. या घटनेमुळे होस्टेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गौरवने नैराश्येतून आत्महत्येचे पाऊल उचलले की त्यास अन्य काही कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. गौरव हा अतिशय हुशार होता. सीए बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तो चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मामांकडेही अनुभव घेण्यासाठी दररोज जात असे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. गौरव हा त्यातीलच एक आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Nashik College Student Suicide in Hostel Crime